चालू घडामोडी आणि दिनविशेष – १५ नोव्हेंबर २०२१

0

चालू घडामोडी आणि दिनविशेष – १५ नोव्हेंबर २०२१

ऑस्ट्रेलिया विश्वविजेते ; न्यूझीलंडवर अंतिम फेरीत आठ गडी राखून वर्चस्व :

 • आखाती देशात रविवारी ऑस्ट्रेलियाच्या रूपात नवा ट्वेन्टी-२० विश्वविजेता उदयास आला. जोश हेझलवूडच्या (३/१६) अफलातून गोलंदाजीनंतर मिचेल मार्श (५० चेंडूंत नाबाद ७७ धावा) आणि डेव्हिड वॉर्नर (३८ चेंडूंत ५३) या जोडीने साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला आठ गडी आणि सात चेंडू राखून नामोहरम केले. वॉर्नर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
 • न्यूझीलंडने दिलेले १७३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत सहज गाठून पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० जेतेपदावर नाव कोरले. कर्णधार आरोन फिंच (५) पुन्हा अपयशी ठरल्यानंतर वॉर्नर आणि मार्श यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ९२ धावांची वेगवान भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. वॉर्नर माघारी परतल्यावरही मार्शने हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावत ग्लेन मॅक्सवेलच्या (नाबाद २८) साथीने संघाला जेतेपद मिळवून दिले. मॅक्सवेलने लगावलेला विजयी फटका सीमारेषेपार जाण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानात धाव घेतली.
 • तत्पूर्वी, फिंचने निर्णायक नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हेझलवूडच्या प्रभावी माऱ्यासमोर डॅरेल मिचेल (११) लवकर बाद झाला. अ‍ॅडम झ्ॉम्पानेसुद्धा टिचून मारा केल्याने विल्यम्सन आणि मार्टिन गप्टिल यांना पहिल्या १० षटकांत फक्त ५७ धावा करता आल्या.
 • त्यानंतर मात्र विल्यम्सनने आक्रमक रूप धारण करताना ३२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. गप्टिल (२८), ग्लेन फिलिप्स (१८) साथ सोडून गेल्यानंतरही विल्यम्सनने १० चौकार आणि तीन षटकारांसह ८५ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. हेझलवूडनेच त्याला माघारी पाठवले. मग जिमी नीशाम (नाबाद १३) आणि टिम सेईफर्ट (नाबाद ८) यांनी उपयुक्त फटकेबाजी केल्यामुळे न्यूझीलंडने २० षटकांत ४ बाद १७२ अशी धावसंख्या उभारली.

२०२४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक अमेरिकेत :

 • लॉस एंजलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, या हेतूने २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेला देण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) विचार करत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
 • ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांना संयुक्तपणे २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद देण्यात येईल, असे समजते. त्या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होण्याची शक्यता असून ५५ सामने खेळवण्यात येऊ शकतात. यंदाच्या तसेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात प्रत्येकी १६ संघ सहभागी असून ४५ लढती खेळवण्यात येणार आहेत.
 •  ‘‘२०२४ ते २०३१ या कालखंडात होणाऱ्या ‘आयसीसी’ स्पर्धाचे यजमानपद अद्याप ठरवण्यात आलेले नाही. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, यासाठी ‘आयसीसी’ फार पूर्वीपासून प्रयत्नशील आहे. त्याशिवाय क्रिकेटमधील उदयोन्मुख संघांनाही जागतिक पातळीवरील स्पर्धाच्या आयोजनाची संधी मिळावी, असा ‘आयसीसी’चा मानस आहे.
 • त्यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धाचा विचार करता २०२४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक अमेरिकेत खेळवणे खेळाच्या दृष्टीने सोयीचे ठरू शकते. लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल’’ असे ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन :

 • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
 • बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते.
 • दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सीबीआय आणि ईडीच्या प्रमुखांसंबंधी मोदी सरकारचा मोठा निर्णय :

 • सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा अध्यादेश सरकारने आणला आहे. या केंद्रीय तपास यंत्रणाच्या प्रमुखांचा कार्यकाळ सध्या दोन वर्षांचा आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दोन्ही अध्यादेशांवर स्वाक्षरी केली आहे. या अध्यादेशानुसार सर्वोच्च संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी तीन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.
 • न्यायमूर्ती एलएन राव यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक एस के मिश्रा यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीसंदर्भातील एका खटल्यात निकाल दिला. यावेळी, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की कार्यकाळ वाढवण्याची परवानगी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच आहे.
 • या अध्यादेशानुसार, अंमलबजावणी संचलनालयाचे संचालक ज्या कालावधीसाठी आपले पदग्रहण करतो, तो कालावधी सेक्शन (अ) नुसार समितीच्या शिफारशीनुसार आणि लिखित स्वरूपात दिल्या गेलेल्या कारणांनुसार एका वेळी एका वर्षासाठी वाढवण्यात येऊ शकतो. अर्थात, हे केवळ पाच वर्षांपर्यंतच करता येते. पाच वर्षांची सेवा झाल्यानंतर संचालकाचा कालावधी वाढवता येत नाही. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ होता आणि १७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.