नवा राजकीय डाव

0 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याची वार्ता झळकली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या . कारण गेल्या काही दिवसांपासून अशा हालचाली होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होतीच . कारण निवडणूक रणनितीकार  अशी देशात ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती तेव्हा अशा काही घडामोडी घडतील आणि राजकीय डावपेच टाकले जातील असे वाटत होते . पण हा प्रकार लवकरच केला जाईल असे मात्र कुणालाही वाटले नव्हते . कारण लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे . त्याचे वारे अजून वाहायचे बाकी आहेत . तर देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असल्याने सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेशाकडे लागलेले आहे . तशात युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशीही चर्चा सुरु झाली आहे . म्हणजे निवडणुका जरी उत्तर प्रदेशात होणार असल्या तरीही त्याचे पडसाद देशात उमटतील आणि देशाचे राजकीय चित्र बदलू शकते असाही अंदाज बांधला जात आहे . अर्थात अशा प्रकारच्या शक्यता या वास्तवात उतरतातच असे नाही तर जर असे झाले तर काय होईल अशा पद्धतीने चर्चा रंगवली जाते . मात्र तरीही राजकीय आघाडीवर त्याचा पद्धतीने रणनीती आखली जात असते . म्हणजे एक शक्यता जर वास्तवात येऊ शकली नाही तर पुढे काय करायला हवे हे आधीच ठरवून ठेवले जाते . त्यातूनच शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरु केले असून मंगळवारी नवी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावण्यात आली आहे . त्यात काँग्रेस सारख्या पक्षाला निमंत्रण देण्यात आले नसल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे . तर काँग्रेसने आपली स्वतंत्र बैठक बोलावली असून त्यात काय होते हेही महत्वाचे ठरणार आहे . पण तूर्तास शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांहाचे लक्ष लागलेले आहे . कारण प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर ही बैठक होत असल्याने देशाला नवा राजकीय पर्याय दिला जाईल अशी त्यावर विचार मंथन केले जाईल असे सांगितले जात आहे . म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना बाजूला सारून वेगळी आणि स्वतंत्र अशी तिसरी आघाडी स्थापन केली जाईल असे सांगितले जात आहे . त्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते पण नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिल्याने हे प्रयत्न बारगळले होते . तेव्हा ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला होता आणि कोलकात्यात भव्य अशी रॅली काढण्यात आली होती तेव्हाही शरद पवार सहभागी झाले होते याचीही आठवण यानिमित्ताने केली जात आहे . अर्थात त्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले असल्याने आणि कोरोनानंतर सर्व संदर्भ बदलले असल्याने यात नवी राजकीय समीकरणे मांडली जाणे साहजिक आहे . तशात शरद पवारांनी देशाचे नेतृत्व करावे असा मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात असल्याने अशा लोकांसाठी निश्चित ही दिलासा देणारी बाब वाटू शकते . पण राजकारणात जे ठरविले त्याच पद्धतीने फासे पडतात असे नाही तर अन्य शक्यताही वास्तवात येत असतात . त्यामुळे पुढे काय होईल याचा अंदाज व्यक्त करणे अवघड असते , हे मात्र तितकेच खरे म्हणावे लागेल .

Leave A Reply

Your email address will not be published.