पाणीप्रश्न पेटणार

0 3

सध्या पावसाळा सुरु झाला नसला तरीही राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे . कारण नुकत्याच आलेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम आहे तसेच येत्या काही दिवसात राज्यात पाऊस कोसळू लागेल त्यामुळे पाणी प्रश्न मिटणार आहे काहींना वाटू शकते . परंतु तशी परिस्थिती नाही . कारण महाराष्ट्राच्या सर्व भात उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाणी टंचाई जाणवू लागते . त्यातून दुर्गम , डोंगराळ भागात तर ही समस्या अतिशय तीव्र असते . त्यातूनच टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागतो . त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करावी लागते , प्रशासकीय पातळीवरून यंत्रणा सज्ज ठेवावी लागते . त्यामुळे उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच याच्या बातम्या झळकू लागतात . लोकांना कशा पद्धतीने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे याची माहिती मिळत असते . पण यंदा असा प्रकार पाहायला मिळाला नाही . कारण कोरोनामुळे अन्य ज्या समस्या होत्या त्याकडे कुणीही फारशा गांभीर्याने पाहिले नाही . परंतु तरीही काही ठिकाणी हा प्रश्न अतिशय उग्र झाल्याने त्याची दखल घेतली गेली . त्यात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पाणी वाद महत्वाचा ठरला आहे . कारण या दोन जिल्ह्यातील पाणी प्रश्न कायम पेटत असतो . असाच वाद राज्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात चिघळत असतो . कारण पाण्याचे वितरण योग्य पद्धतीने केले जात नाही त्यामुळे काही भागातील नागरिकांवर अन्याय होतो अशी भावना निर्माण होते . त्यातही या काळात म्हणजे उन्हाळ्यात शेतीचा रब्बी हंगाम घेतला जातो अशावेळी पाण्याची गरज असते . वेळीच पाणी मिळाले नाही तर पीक जळून जाण्याची शक्यता असते . अशावेळी शेतकरी आक्रमक होतात . त्यातून आंदोलन सुरु होते . आताही या दोन जिल्ह्यातील वातावरण असेच पेटले आहे . त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय घेतले गेले . त्यामुळे वातावरण तापले आणि लोकांचे लक्ष याकडे वेधले गेले . कारण उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत करत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर हालगी नाद आंदोलन केले जात आहे. सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी त्यांनीदेखील विरोध दर्शवक अशा पद्धतीचा निर्णय झाला तर रक्तरंजित लढाईला तयार रहावे असा इशारा ठाकरे सरकारला दिला. खरे तर पाण्याचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा त्याची तीव्रता वाढत जाते . त्यात लोकांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणावर असतो . अशावेळी नेत्यांची जबाबदारी वाढत असते . कारण नेत्यांमुळेच आपल्याला पाणी मिळत नाही अशी भावना निर्माण होत असते . हा प्रकार राज्याच्या सर्व भागात होत असल्याने पाणी वाटपाचा प्रश्न यानिमित्ताने समोर येत असतो . त्यामुळे याबाबत राज्य सरकारने नव्याने धोरण ठरवावे म्हणजे असे वाद चिघळणार नाहीत .

Leave A Reply

Your email address will not be published.