स्वबळाची खुमखुमी

0 5

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना अद्याप बराच अवकाश आहे . पण तरीही स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरु झाली आहे . म्हणजे तशी भाषा केली जात आहे . त्याची सुरवात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असल्याने सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही त्याचा विचार करावा लागला . त्यातूनच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणुका लढवतील असे काही नेत्यांनी सांगायला सुरवात केली आहे . अर्थात पुढे काय होईल हे आताच सांगता येत नसते . पण तरीही राजकीय समीकरणे कशी राहतील याची लोकांना उत्सुकता लागलेली असते . त्यामुळे हा विषय चर्चेत येत असतो . तशात राजकारण हा मराठी माणसांचा आवडता विषय असल्याने त्याची खमंग अशी चर्चा केली जाते . त्याचबरोबर प्रत्येक राजकीय पक्ष आपले आस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करीत असतो . धडपड करीत असतो . आपला जनाधार वाढावा यासाठी जे प्रयत्न करायचे असतात तंटे सर्व प्रयत्न केले जातात . त्यानंतर जेव्हा बहुमत मिळत नाही तेव्हा मात्र नाईलाजाने युती आणि तर आघाडी करावी लागते . हाच प्रकार महाराष्ट्रात घडला आणि महाविकास आघाडीची निर्मिती झाली . त्यात शिवसेनेला पुढे करण्यात येऊन मुख्यमंत्रीपद देण्यात आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दुय्यम भूमिका स्वीकारली . कारण तेव्हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच मुख्य अजेंडा होता . त्यासाठी महाविकास आघाडी निर्माण झाली . पण नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जवळीक निर्माण होत गेली आणि काँग्रेसला कमी महत्व मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली . त्यातही कमी महत्वाची मंत्रीपदे काँग्रेसच्या वाट्याला देण्यात आली आणि कुरबुरी सुरु झाल्यात . त्यात सोनिया गांधी , शरद पवार यांचीही भूमिका महत्वाची असल्याने राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना नमते घ्यावे लागले . पण किती काळ असा प्रकार होत राहणार हा खरा प्रश्न असल्याने काँग्रेसने शेवटी स्वबळाची भाषा वापरयाला सुरवात केली . असे झाले तर त्याचा परीणाम सरकारवर होईल असेही काहींना वाटू लागले आहे . पण आताच तसे होईल ते दिसत नाही . कारण असे झाले तर सरकार लगेच पडू शकते . त्यामुळे हे वादळ फार काळ टिकेल असे दिसत नाही . मात्र तरीही यानिमित्ताने राज्यात नवीन समीकरणे निर्माण होतील असे दिसते . त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र निवडणुका लढाऊ शकतील . असे झाले तर भाजप आणि काँग्रेस यांनाही  स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्या लागतील . त्यात आणखी तिसरी आघाडी असेल . म्हणजे मतांचे विभाजन अटळ होईल हे या पक्षांना परवडण्यासारखे राहील का हा महत्वाचा प्रश्न असेल . त्यामुळे आगामी काळात काय काय राजकीय घडामोडी घडतील हे आताच सांगणे योग्य ठरणार नाही . पण तरीही राजकीय विषय असला की लोक त्यात मोठ्या हिरीरीने सहभागी होत असल्याने अशा विषयांची चर्चा सातत्याने केली जाते . त्यामुळे स्वबळाची भाषा ता जरी वापरली जात असली तरीही ती शेवट्पर्यंत कायम राहील याची खात्री देता येत नसते .

Leave A Reply

Your email address will not be published.